Tiranga Times Maharashtra
आयसीसीच्या अधिकृत वनडे क्रमवारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1 स्थानी पोहोचला, पण या घोषणेदरम्यान आयसीसीकडून मोठी चूक झाली आणि तीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 93 धावांची दमदार खेळी केल्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. बुधवारी आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा केली.
मात्र, या घोषणेमध्ये विराट कोहलीच्या नंबर 1 स्थानाशी संबंधित कालावधीबाबत आयसीसीने तब्बल 722 दिवसांचा घोळ घातला. ही चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी आयसीसीवर टीकेची झोड उठवली. काही वेळातच ही बाब व्हायरल झाली आणि क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. अखेर टीकेनंतर आयसीसीला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी अधिकृतरित्या दुरुस्ती करत योग्य माहिती प्रसिद्ध केली.
जवळपास चार वर्षांनंतर विराट कोहली पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी 2021 मध्ये तो नंबर 1 होता. विशेष म्हणजे 2013 मध्ये विराटने पहिल्यांदा वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्यानंतर अनेक चढउतार पाहायला मिळाले, पण सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
